
अमरावती, ६ ऑगस्ट (हिं.स.) : न्यायाच्या प्रतीक्षेत तब्बल १२ वर्षे पाठपुरावा करणाऱ्या एका युवकाने कागदपत्रांचे कट्टे डोक्यावर घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश केल्याची घटना बुधवारी चर्चेचा विषय ठरली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी अमोल ठाकरे हा पस्तिशीतील युवक कागदपत्रांनी भरलेले कट्टे घेऊन थेट जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचला. न्याय मिळविण्यासाठी केलेल्या प्रदीर्घ पाठपुराव्याचे हे कागदपत्रांचे ओझे असल्याचे त्याने सांगितले.
अमोल ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर गावात दोन भूखंड होते. त्यापैकी एक भूखंड वडिलांच्या नावावर, तर दुसरा भूखंड आजीच्या नावावर होता. मात्र, आजीच्या नावावरील भूखंडाची नोंद दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याची तक्रार त्यांनी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामपंचायत, नांदगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती.
या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी अमोल यांनी विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीन वेळा उपोषण व ठिय्या आंदोलन केले. तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडेही लेखी निवेदने देऊन पाठपुरावा केला.
२०१४ पासून ऑगस्ट २०२६ पर्यंत जवळपास १२ वर्षांच्या या पाठपुराव्यात अर्ज, निवेदने आणि तक्रारींचे मोठे गठ्ठे जमा झाले. मात्र, अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत अमोल यांनी व्यक्त केली.
वारसा हक्काने वडील आणि आजी यांच्या नावावरील जागा आपल्या नावावर होणे अपेक्षित असताना ती अन्य व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषद कार्यालयात कागदपत्रांचे कट्टे सादर केल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे अमोल ठाकरे यांनी सांगितले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी