सापनच्या जलशुद्धीकरण केंद्रातून चामडोक पळाले
- पाणी उपसा व जाळीचा प्रयोग ठरला यशस्वी, अधिकाऱ्यांच्या कृतीला यश अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)। सापन धरणावरून जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून ८३ गावांना पाणीपुरवठा सुरू असताना अचानकपणे मागील तीन दिवसांपासून त्यामध्ये कोटींच्या संख्येने चामडोकांच
सापनच्या जलशुद्धीकरण केंद्रातून चामडोक पळाले


- पाणी उपसा व जाळीचा प्रयोग ठरला यशस्वी, अधिकाऱ्यांच्या कृतीला यश

अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

सापन धरणावरून जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून ८३ गावांना पाणीपुरवठा सुरू असताना अचानकपणे मागील तीन दिवसांपासून त्यामध्ये कोटींच्या संख्येने चामडोकांची संख्या आढळून आली होती. अशावेळी उपसा करण्याचा व वेगळ्या प्रकारची जाळी बसविण्याचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला असून आता स्वच्छ पाणीपुरवठा सुरू होण्यास मार्ग मोकळा झाल्याने अधिकाऱ्यांच्या कृतीला यश आले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलजीवन मिशन अंतर्गत अचलपूर तालुक्यातील ४९ व चांदूरबाजार तालुक्यातील ३४ गावांना सापन धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन दिवसांपासून पाण्याचे नमुने तपासताना सदर पाण्यात मोठ्या प्रमाणात चामडोकांची संख्या आढळून आली होती. या सूक्ष्मजीवांची संख्या कोटींच्या घरात गेल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतली होती. सुरवातीला पीएसी, ब्लिचिंग पावडर, पोटॅशियम परमॅग्नेट, मीठ आणि रसायन यांचा वापर करून चामडोक नियंत्रणाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हे सूक्ष्मजीव नष्ट न होता वाळूच्या गाळणीतूनही जलशुद्धीकरण केंद्रात प्रवेश करीत असल्याचे आढळून आले होते. मग अधिकाऱ्यांनी विशेष प्रकारची जाळी बसवून घेतली, यासह धरणातील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. सोबतच त्याठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र व संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. यादरम्यान पाणीपुरवठा प्रभावी होत असल्यामुळे यादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जुने पर्याय वापरून पाणीपुरवठा सुरू ठेवला होता. स्वतः तीन दिवस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्लांटवर तळ ठोकून होते. आज पाण्याचे नमुने घेतल्यानंतर ते पूर्ण रूपात स्वच्छ आढळून आले. त्यामुळे पुन्हा एकदा सदर गावांना नियमितपणे पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान यावेळी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande