लातूर जिल्ह्यात २९१ मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांमध्ये २४,०३८ नागरिकांची आरोग्य तपासणी
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समार
मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर


लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्य शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप झाला. १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात एकूण २९१ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये २४,०३८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला. लातूर जिल्ह्यात

हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला. शिबिरांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

या २९१ शिबिरांमध्ये १०,६९१ पुरुष, १३,३४७ महिला, अशा एकूण २४,०३८ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. याशिवाय ६३० आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. शिबिरांमध्ये नागरिकांची विविध आजारांसाठी आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन व इतर आवश्यक निदान चाचण्या करण्यात आल्या. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य रुग्णालयांमध्ये संदर्भित होण्यासाठीचा सल्ला देण्यात आला. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर शासकीय आरोग्य योजनांतर्गत उपलब्ध उपचार सुविधांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश खरोळकर, डॉ. महेश पाटील, समन्वयक शिवहार मुळे, नितीन पोतदार आणि सुनील हालसे यांनी जिल्ह्यातील शासकीय व संलग्नित खासगी रुग्णालये, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून शिबिरांचे नियोजन, आयोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, लातूर शहर महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्नित खासगी रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालये, तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व संबंधित विभागांनी मोलाचे योगदान दिले.

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी, निदान, मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने हा उपक्रम लोकाभिमुख व परिणामकारक ठरला. भविष्यातही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या समन्वयातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशाच लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande