
करार झाला, तरीही पुरवठ्यास विलंब
यवतमाळ, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
धान्य वाटपाचा करार संपुष्टात आल्यामुळे शालेय पोषण आहार वाटपाचे नियोजन बिघडले होते. मुख्याध्यापकांनी उधारीवर धान्य आणि इतर आवश्यक वस्तू आणून पोषण आहार वाटप केला. आता उधारीसुद्धा मिळणे अवघड झाले आहे. आता मात्र, धान्य वाटपाचा करार झाला असून, लवकरच जिल्ह्यात धान्य येईल, अशी खात्री शिक्षण विभागाला आहे. तरीसुद्धा आणखी काही दिवस धान्य उपलब्ध होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा पहिली ते आठवीपर्यंतचे दोन लाख ३९ हजार ३०२ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार वाटप केल्या जात आहे. यात प्रामुख्याने डाळ, तेल, मसाले, चटणी, मीठ, हळद, कांदा, लसूण, कडधान्य आदी धान्य शाळास्तरावर शिल्लक होते. तर जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळणारा तांदूळ आणि शाळांकडे शिल्लक असलेल्या धान्यामुळे कुठल्याही अडचणीविना पोषण आहार वाटप करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात जवळपास दीड महिने निर्विघ्नपणे पोषण आहार वाटप केला. परंतु जुलै महिन्यात बहुतांश शाळांकडील धान्य तसेच इतर वस्तू संपल्या. परिणामी, पोषण आहार वाटपाची वांदेवाडी निर्माण झाली. शेवटी बहुतांश शाळेच्या मुख्याध्यापकांनी उधारीवर धान्य तसेच इतर आवश्यक वस्तू आणून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यास सुरवात केली होती. धान्य तसेच इतर वस्तू वाटपाचा कंत्राट संपुष्टात आल्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मध्यंतरी राज्यस्तरावर कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शासनस्तरावर धान्याकरिता पाठपुरावा केला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एका कंपनीसोबत करार झाल्याची माहिती प्राप्त झाली असून, लवकरच शाळांना धान्य तसेच आवश्यक असलेल्या संपूर्ण वस्तू मिळणार आहे. तद्नंतर पोषण आहार वाटप नियमित सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा आणखी काही दिवस प्रतीक्षा केल्याशिवाय प्रशासनासमोर पर्यायच नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची चांगलीच चिंता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आता पाककृतीत एका डाळीची भर
पूर्वी पोषण आहारामध्ये मूग आणि तूर डाळ दिल्या जात होती. तसेच चार प्रकारच्या कडधान्यांचा समावेश होता. यंदा मसूर डाळीची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रती विद्यार्थी काही पैशातसुद्धा वाढ झाली आहे. तर अंडी, केळी तसेच इतर पोषक वस्तू लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना देता येणार आहे. याकरिता मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहे.
तांदूळ विनाविघ्न होते उपलब्ध
शालेय पोषण आहारात देण्यात येणार्!या खिचडीचा तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळतो. दैनंदिन तब्बल २९ टन म्हणजे महिन्याकाठी जिल्ह्याला ८७० टन तांदूळ पोषण आहाराकरिता आवश्यक आहे. तांदूळ वाटपात कुठल्याही अडचणी जात नसल्याची माहिती आहे. धान्य आणि इतर वस्तूंकरिताच प्रशासनाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी