
अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यभूमी गुरुकुंज मोझरी आणि धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी भेट मिळाली आहे. गुरुकुंज मोझरीसाठी १४७ कोटी आणि कौंडण्यपूरसाठी.२२४ कोटी रुपयांचा विकास आराखडा उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. याशिवाय, वलगाव येथील संत गाडगेबाबा समाधी परिसराच्या विकासासाठी १० कोटी ९९ लाख रुपयांच्या कामांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक आमदार राजेश वानखडे यांनी दिली.
आमदार राजेश वानखडे यांनी सांगितले की, राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या जुन्या वास्तूंचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यांचे नूतनीकरण (रिनोवेशन) केले जाईल. मोझरी येथे दरवर्षी येणाऱ्या लाखो भक्तांसाठीं भक्त निवास, ध्यान केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीने या आराखड्याला मंजुरी दिली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी एचपीसी बैठकीत याबद्दल माहिती दिली. या प्रकल्पांमुळे अमरावती जिल्ह्यातील पर्यटन आणि आध्यात्मिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
गुरुकुंज मोझरी आराखड्याची वैशिष्ट्ये
आध्यात्मिक संकुलासाठी १७ कोटी ३५ लाख, ग्राम विकास प्रबोधिनीसाठी ६ कोटी ७९ लाख आणि पालखी महोत्सव भवनासाठी ९ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद.
राष्ट्रसंतांच्या काळातील इमारतींच्या रिनोवेशनसाठी १९ कोटी १७ लाख, समाधीचे दगडी शिल्प उभारण्यासाठी ९ कोटी ५८ लाख, तर सीताराम महाराज कुटीसाठी १ कोटी ४४ लाख रुपये,
भक्त निवास (६ कोटी), सौर ऊर्जा व शेती (१० कोटी १७ लाख), वृद्धाश्रम (३ कोटी ३१ लाख), व्ही. आय. पी. विश्रामगृह (३ कोटी १८ लाख), सप्तनदी कुंड व अस्थी विसर्जन स्थल विकास (२ कोटी २९ लाख), तसेच रस्ते, वीज व अंतर्गत सजावटीसाठी २७ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी