
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केला.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचा 'बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६' विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच १०० टक्के ऊसतोड हार्वेस्टरद्वारे करणारा देशातील पहिला साखर कारखाना म्हणून मांजरा साखर कारखान्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा रेणा साखर कारखाना येथे
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर-देशमुख, माजी चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, रणजित पाटील, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, सचिव रविशंकर बरमदे आदींची उपस्थिती होती.
मांजरा साखर कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ऊसतोडणीची प्रक्रिया
हार्वेस्टरच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा उपक्रम राबविला. ऊसतोडणीसाठी मजुरांची कमतरता, वाढते ऊस क्षेत्र आणि गाळप हंगामातील विलंब यावर प्रभावी उपाय म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेल्या या उपक्रमाला शेतकरी आणि तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व होतकरू तरुणांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण
भागातील अनेक शेतकऱ्यांनी हार्वेस्टर खरेदी करून ते साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून दिले. परिणामी, २०२५-२६ च्या गाळप हंगामात ८० हार्वेस्टरच्या माध्यमातून कारखान्याची १०० टक्के ऊसतोडणी पूर्ण करण्यात आली.
सहकार, शेतकरी हित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मांजरा साखर कारखान्याने मिळविलेले हे यश संपूर्ण साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरले असून, या कामगिरीबद्दल राज्यभरातून मांजरा परिवाराचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis