
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत ‘मेरा युवा भारत, हिंगोली’ यांच्या वतीने डॉ. हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ डेंटल कॉलेज, हिंगोली येथे ‘जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विशेष अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली ग्रामीण) नारायण देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “नशा ही केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला अवनतीच्या मार्गावर नेते. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर देशातील युवा शक्तीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.”
या कार्यक्रमास डॉ. हंसराज खुराणा, प्राचार्य डॉ. विवेक चौकसे, रासेयो, जिल्हा समन्वयक डॉ. पवन वासणिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर इंगोले, कार्यक्रम समन्वयक डॉ. श्वेता हाबू, सहायक पोलीस निरीक्षक विकास आडे, ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगावीकर तसेच अनिल ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर तसेच मानसिक स्थितीवर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रासेयोच्या स्वयंसेवकांनी जनजागृतीपर विचार मांडत उपस्थितांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली.
नशामुक्त समाजनिर्मितीसाठी जिल्हाभर जनजागृती
‘मेरा युवा भारत’च्या प्रतिनिधींनी या अभियानाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार असून, प्रत्येक गावातील तरुणांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. युवा वर्गाने व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सक्षम समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis