
अमरावती, ६ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती शहराच्या पंचवटी परिसरातील प्रसिद्ध हॉटेल रोशनी अँड स्वीट्सवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करत हॉटेलचा परवाना रद्द केला आहे.
एफडीएच्या अधिकारी देशमुख यांच्या पथकाने अचानक हॉटेलची तपासणी केली असता स्वयंपाकघरासह संपूर्ण हॉटेल परिसरात अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यांची स्वच्छताही समाधानकारक नसल्याचे तपासणीत समोर आले.
अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली. स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याने हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला.
पंचवटी परिसरातील हे हॉटेल अल्पोपहार, चहा आणि मिठाईसाठी प्रसिद्ध असून, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असल्याने येथे दररोज एसटी बसने प्रवास करणारे हजारो प्रवासी नाश्ता व चहासाठी थांबत असतात. त्यामुळे एफडीएच्या या कारवाईची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
एफडीएने सर्व हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी