
यवतमाळ, ६ ऑगस्ट (हिं.स.) : समाधानकारक पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, तालुक्यातील जलसाठ्यांमध्येही वाढ झाली आहे. पोफाळी तलावात सध्या सुमारे ६० टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्यात पोफाळी तलाव जवळपास ८० टक्के कोरडा पडला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ओढे-नाले कोरडे असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, जुलैच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला आणि तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
तलावातील जलसाठा वाढल्याने पोफाळी परिसरातील चार ते पाच गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच या तलावावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्यालाही आधार मिळाला आहे. तलावाच्या पाण्यावर हजारो एकर शेती सिंचित होत असून, शेतकरी विविध पिकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन घेतात.
जलसाठा वाढल्याने शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटला आहे. मात्र, दुसरीकडे पोफाळी तलाव अद्याप अनेक समस्यांच्या विळख्यात असल्याचे चित्र आहे.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, बेशरमच्या झाडांनी तलाव परिसर व्यापला आहे. अनेक वर्षांपासून तलावाच्या विकासासाठी शासनाकडून ठोस निधी मिळालेला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
तलाव परिसरात विजेची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना जंगली व हिंस्त्र प्राण्यांची भीती सतावत असते. रात्री-अपरात्री या मार्गाने ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
पोफाळी तलावातील वाढलेल्या जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी तलावाचे गाळमुक्तीकरण, परिसराचा विकास, चौकीची दुरुस्ती आणि प्रकाशव्यवस्था यांसारख्या मूलभूत कामांसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून तलावाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी