
नाशिक, ६ ऑगस्ट (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘साधुग्राम’ प्रकल्पासाठी आरक्षित १९१.२१ एकर जमिनीचे भूसंपादन वेगाने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात देश-विदेशातून मोठ्या संख्येने साधू-महंत आणि भाविक दाखल होणार आहेत. त्यांच्या निवास व सुविधांसाठी ‘साधुग्राम’ प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षित जमीन तातडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या जमिनीचे भूसंपादन करताना संबंधित भूधारकांना नियमानुसार मोबदला अदा करून जागा ताब्यात घेण्याची जबाबदारी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
साधुग्राम प्रकल्पासाठी एकूण २२६७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत आणि शासनाच्या अटी व शर्तीनुसार पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.महानगरपालिका क्षेत्रातील साधुग्राम भूसंपादन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली असून, आरक्षित क्षेत्रातील विविध सर्व्हे क्रमांकांमधील १९१.२१ एकर जमीन संपादन करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV