
रत्नागिरी, 6 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत (वर ५५) यांच्या पार्थिवावर आज रत्नागिरीच्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांचे काल (दि. ५ ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.
एका रुग्णाला कोल्हापूर मधील रुग्णालयात दाखल करून त्याच्यावरील उपचारांची व्यवस्था लावण्यासाठी ते कोल्हापूरला गेले होते. तेथून रत्नागिरीकडे येत असताना प्रवासात त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बरोबरच्या व्यक्तींनी त्यांना पालीच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मरण पावल्याचे सांगितले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला.
पक्षसंघटना बांधणीसाठी सावंत यांनी अनेक वर्षे मोठे काम केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी २००४ मध्ये विधानसभेची निवडणूक सर्वप्रथम लढविली, तेव्हा सावंत यांनी त्यांना भरपूर मदत केली होती. दहा वर्षांनी उदय सामंत शिवसेनेत दाखल झाले तेव्हा सावंतही त्यांच्यासोबत शिवसेनेचे गेले. मात्र श्री. सामंत यांच्याशी मतभेद झाल्यामुळे सावंत यांनी नगरसेवकपदाचा आणि शिवसेनेचाही राजीनामा दिला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा संघटनेचे ते अध्यक्ष झाले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची कन्या शिवानी माने म्हणजे भाजपमधून शिवसेना उबाठा पक्षात गेलेले ज्येष्ठ नेते बाळ माने यांची सून. शिवानी ‘उबाठा’कडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत असल्यामुळे नैतिकतेच्या भूमिकेतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेले काही दिवस ते राजकारणापासून अलिप्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी