धुळे - घरगुती गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा तहसील कार्यालयात ठिय्या
धुळे, 06 ऑगस्ट (हिं.स.)शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावात घरगुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने बुधवारी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. बुकिंग करूनही दोन-दोन महिने सिलिंडर मिळत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी रिकामे सिलिंडर घेऊन थेट शिंदखेड
धुळे - घरगुती गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा तहसील कार्यालयात ठिय्या


धुळे, 06 ऑगस्ट (हिं.स.)शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावात घरगुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने बुधवारी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. बुकिंग करूनही दोन-दोन महिने सिलिंडर मिळत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी रिकामे सिलिंडर घेऊन थेट शिंदखेडा तहसील कार्यालय गाठत पुरवठा विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.ग्रामस्थांनी संबंधित गॅस वितरकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नियमित गॅस पुरवठा होत नसल्याचा आरोप केला. काही ग्राहकांना प्रत्यक्षात सिलिंडर न मिळताच डिलिव्हरी दाखवून अनुदान (सबसिडी) जमा केल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच गॅस सिलिंडरच्या कथित काळाबाजाराबाबत चौकशीची मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाला निवेदन देत अमित गॅस एजन्सी, दोंडाईचा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. वारंवार तक्रारी करूनही आणि प्रशासनामार्फत सूचना देऊनही गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

आंदोलनाची दखल घेत पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदवार यांनी तात्काळ संबंधित गॅस वितरकाशी संपर्क साधला. यानंतर वितरकाकडून लेखी हमी घेण्यात आली. त्यानुसार, शेवाडे गावात १०० एलपीजी गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण करण्यात येईल तसेच पुढील काळात टप्प्याटप्प्याने नियमित पुरवठा सुरू ठेवला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, भविष्यात पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदवार यांनी संबंधित वितरकाला नियमित गॅस पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे सांगितले असून, यापुढे अशा तक्रारी आल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande