
नांदेड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात राबविलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण व शहरी भागात आयोजित १२२ शिबिरांत १३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तसेच ३ हजार १२१ आयुष्मान भारत व आभा कार्डाची नोंदणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने हा उपक्रम राबविला. जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सीईओ महेश पाटील, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनात आयोजन
केले होते. शिबिरांत ४,२१० पुरुष, ६,७२२ महिला, १०६९ पुरुष बालक व १,६१८ महिला बालकांची आरोग्य तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आदी तपासण्यांसह नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयांकडे संदर्भित केले. या उपक्रमात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, महापालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच संलग्न खासगी रुग्णालयांनी सहभाग घेतला. डॉ. चंद्रकांत मुंडे, गजानन वानखेडे, संभाजी लोंढे यांनी विविध यंत्रणांत समन्वय साधून शिबिरांची प्रभावी अंमलबजावणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis