
परभणी, 06 ऑगस्ट (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत गंगाखेड उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम १०० टक्के काम पूर्ण करण्याचा मान मिळविला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडने मानाचा बहुमान पटकावला आहे.
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० वाजेच्या ,एसआयआर अहवालानुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ४,१७,४८१ पैकी सर्व ४,१७,४८१ गणना प्रपत्रांचे वितरण (१०० टक्के) पूर्ण झाले असून ३,८०,६८२ (९१.१९ टक्के) गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे.या उल्लेखनीय यशामागे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित आढावा आणि प्रभावी नियोजन हे महत्त्वाचे कारण ठरले. तसेच मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी वेळोवेळी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, समस्या निराकरण आणि समन्वय साधून संपूर्ण प्रक्रियेला गती दिली.उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जीवराज डापकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणेने संघभावनेने कार्य केले. यामध्ये पालमचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गंगाखेडच्या तहसीलदार उषाकिरण शृंगारे आणि पूर्णाचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामाचा पाठपुरावा करून मोलाची जबाबदारी पार पाडली.तसेच गंगाखेड उपविभागातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, रास्त भाव दुकानदार, महा-ई-सेवा केंद्र चालक, बीएलओ, बीएलए तसेच इतर क्षेत्रीय कर्मचारी यांनी वेळेचे कोणतेही बंधन न ठेवता घरोघरी जाऊन नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांचे सहकार्य मिळवून विहित मुदतीत सर्वेक्षण, गणना प्रपत्रांचे वितरण, पडताळणी आणि आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.संपूर्ण यंत्रणेच्या एकजुटीमुळे आणि उत्कृष्ट समन्वयामुळे गंगाखेड उपविभागाने जिल्ह्यात तसेच विभागात आदर्शवत कामगिरीची नोंद केली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तसेच संपूर्ण गंगाखेड उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis