पळसदरीजवळ वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू
रायगड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत-खोपोली ५४८/अ महामार्गावरील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास वॅगनार कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील अंबरनाथ येथील सोनाली हिचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चाल
Horrific-collision-between-Wag


acc


रायगड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत-खोपोली ५४८/अ महामार्गावरील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास वॅगनार कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील अंबरनाथ येथील सोनाली हिचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक रोहित वाघमारे (रा. पोशिर) गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेनंतर अर्धवट रस्ता आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माहितीनुसार, ताकई येथील मित्रांचा एक गट साजगाव येथील चालकासह माथेरानकडे जात होता. त्याचवेळी पळसदरी येथे समोरून येणाऱ्या वॅगनार कारची रोहित वाघमारे यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दुचाकीवरील सोनाली यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रोहित वाघमारे यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे दाखल करण्यात आले.

अपघातानंतर श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलविण्यास सहकार्य केले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून काही भागात रस्ता अचानक अरुंद होतो. तसेच इशारा फलक, परावर्तक आणि सुरक्षा बॅरिकेड्सचा अभाव असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत.

रस्त्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला अनेक शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून मिळालेला नसल्याने काम रखडल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी रस्ता तातडीने पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande