'आणखी किती बळी?' पळसदरीत प्रशासनाविरोधात आज जनआक्रोश
रायगड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी सायंकाळी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करत रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली. मुरबाड–कर्जत–
How-many-more-lives-lost-Pu


How-many-more-lives-lost-Pu


रायगड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी सायंकाळी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करत रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली.

मुरबाड–कर्जत–खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पळसदरी परिसरात वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अपघातानंतर पळसदरी पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी, वाहनचालक, प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्री स्वामी समर्थ मठ परिसरात एकत्र आले.

आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले.

नागरिकांनी सांगितले की, अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असून आवश्यक इशारा फलक, बॅरिकेड्स, परावर्तक आणि इतर सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून कायमस्वरूपी सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविणे, रस्त्याची रुंदी वाढविणे, इशारा फलक व बॅरिकेड्स बसविणे आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. आता तरी प्रशासन जागे व्हा... आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलनाची सांगता करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande