होमियोपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात आयएमएचे कामबंद आंदोलन; अमरावतीत हजारो रुग्ण उपचाराविना
अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.) राज्य शासनाने होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मध्ये नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने गुरुवारी राज्यभर २४ तासांचे कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा अ
होमियोपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात आयएमएचे कामबंद आंदोलन; अमरावतीत हजारो रुग्ण उपचाराविना


अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)

राज्य शासनाने होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मध्ये नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने गुरुवारी राज्यभर २४ तासांचे कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा अमरावती जिल्ह्यातही मोठा परिणाम दिसून आला. शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने हजारो रुग्णांना उपचाराविना परतावे लागले. मात्र, आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता विभाग पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्याने गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले.राज्य शासनाने नुकताच होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण आणि आधुनिक वैद्यक पद्धतीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत आयएमएने तीव्र विरोध नोंदविला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राचा स्वतंत्र दर्जा कायम ठेवावा आणि हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.अमरावतीतील आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असून रुग्णांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यभर एकदिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. शासनाने या विषयावर तज्ज्ञ समितीची मते विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.दरम्यान, ओपीडी बंद असल्याने नियमित तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय झाली. अनेक रुग्णांना औषधोपचार आणि तपासणी न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागले. कामबंद आंदोलनामुळे आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असली तरी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मात्र सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या. आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन पुढील भूमिका काय घेते, याकडे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande