
अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरालगतच्या राजुरा नाका परिसरात बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास राजुरा येथील निखिल संतोष गिरी (वय ३२) हे आपल्या आईला दुचाकीवर घेऊन शहराकडे येत असताना बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच राजुरा नाका परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्रेजरपुरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला.
याच परिसरात यापूर्वीही घनश्याम गहेकर तसेच निलेश किसन पवार यांच्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे राजुरा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून वनविभागाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी काही वेळाने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा केला. तर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पिंजरा लावणे, गस्त वाढविणे आणि बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. घटनास्थळी एक नव्हे तर तब्बल तीन बिबटे दिसल्याचा दावा नागरिकांनी केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले असून वनविभागाने तातडीने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.-----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी