
जळगाव, 06 ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील या कार्यक्रमाची प्रगती विचारात घेऊन मुदतवाढ देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या 4 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रान्व्ये विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला करण्यात आहे. त्यानुसार सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटी ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत देणार आहेत. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण / पुनर्रचना कार्यक्रम १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार असून प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत असून नोटीस टप्पा किंवा दावे व हरकती निकालात काढण्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत असणार आहे. तर अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याचे उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर