रायगड - डेंग्यूच्या रुग्णानंतर नगरपरिषद प्रशासनाची त्वरित कारवाई
रायगड, 06 ऑगस्ट, (हिं.स.) : खोपोली नगर परिषद हद्दीतील सिद्धार्थ नगर परिसरात एका युवकाला डेंग्यू व मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवल्या. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाला
Municipal Council administration takes immediate action following a dengue case.


रायगड, 06 ऑगस्ट, (हिं.स.) : खोपोली नगर परिषद हद्दीतील सिद्धार्थ नगर परिसरात एका युवकाला डेंग्यू व मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवल्या. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाला तत्काळ कारवाईचे निर्देश दिल्यानंतर परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

माहितीनुसार, सिद्धार्थ नगर हा दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बाब नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, आरोग्य सभापती मयुरी शेलार, बांधकाम सभापती अनिल सानप आणि महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

यानुसार, आशा सेविकांनी संबंधित रुग्णाच्या घरी भेट देऊन आरोग्य तपासणी व आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सिद्धार्थ नगर परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक पावडरची फवारणी केली. परिसरातील स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला.

या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत तत्परता दाखवल्याबद्दल नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, आरोग्य सभापती मयुरी शेलार, बांधकाम सभापती अनिल सानप आणि महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे यांचे नागरिकांनी आभार मानले. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, साचलेले पाणी टाळावे आणि ताप किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande