मराठवाडा कृषी विद्यापीठातील कंत्राटी कामगार आंदोलनावर तोडगा नाही; कुलगुरूंसोबतची बैठक निष्फळ
परभणी, 06 ऑगस्ट (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कंत्राटी कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीव
मराठवाडा कृषी विद्यापीठातील कंत्राटी कामगार आंदोलनावर तोडगा नाही; कुलगुरूंसोबतची बैठक निष्फळ


परभणी, 06 ऑगस्ट (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कंत्राटी कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.06) कुलगुरूंसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. वेतनवाढीच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

किमान वेतन, विशेष भत्ता, कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) तसेच शासनाच्या नियमानुसार वेतनवाढ लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीला आमदार डॉ. राहुल पाटील, कुलसचिव काळे, भगवान आसेवार, ठोंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, विकी जोंधळे, शरद रनेर, बालाजी रनेर, शशी शिंदे, प्रताप चव्हाण, राधिका रनेर तसेच महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ प्रशासनाने अकुशल कामगारांच्या वेतनात प्रतिदिन 50 रुपये, तर कुशल कामगारांच्या वेतनात 200 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, संघटनांनी अकुशल कामगारांना प्रतिदिन 200 रुपये आणि कुशल कामगारांना 300 रुपयांची वाढ देण्याच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली. याशिवाय सर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार किमान वेतन अधिनियम, 1948 नुसार वेतन, विशेष भत्ता, ईएसआय तसेच शासनाच्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणीही संघटनांनी केली. दोन्ही बाजूंमध्ये वेतनवाढीच्या मुद्द्यावर एकमत न झाल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रशासकीय भवनासमोरील कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन पूर्ववत सुरू ठेवण्याचा तसेच पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी कामगार संघटनेने घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande