पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंतीत दुर्गवीरांची इतिहासाला मानवंदना; ७५ दुर्गवीरांसह चिमुकल्यांचाही सहभाग
कोल्हापूर, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने १ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर भव्य पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील ७५ दुर्गवीरांनी या ५४ किलोमीटरच्या पद
कोल्हापूर


कोल्हापूर, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने १ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर भव्य पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील ७५ दुर्गवीरांनी या ५४ किलोमीटरच्या पदयात्रेत सहभाग घेत शिवराय, बाजी प्रभू देशपांडे आणि मावळ्यांच्या शौर्याला अभिवादन केले. या मोहिमेचे संपूर्ण नियोजन दुर्गवीर प्रतिष्ठानचे प्रशांत डिंगणकर, संदीप गावडे आणि रविंद्र रावराणे यांनी केले, तर कोल्हापूरचे ऋद्र पाटील यांनी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली.

पदयात्रेदरम्यान महाराज आणि बाजी प्रभूंची अखेरची भेट ज्या परिसरात झाली, त्या पवित्र भूमीला वंदन करत तसेच मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचे दर्शन घेत सहभागी भावूक झाले. या प्रवासाने ध्येय, चिकाटी आणि सहकार्याची प्रेरणा दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या पदभ्रमंतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चार वर्षांच्या चिमुकलीसह एकूण पाच लहान मुलांनीही या ५४ किलोमीटरच्या मोहिमेत सहभाग घेतला. खडतर प्रवासात मोठ्यांसोबत चिमुकल्यांनीही जिद्द, चिकाटी आणि एकजुटीचे दर्शन घडवले. थकलेल्या सहकाऱ्यांना आधार देत आणि एकमेकांचे मनोबल वाढवत सर्वांनी ही पदयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

ही पदभ्रमंती केवळ ट्रेक नसून शिवकालीन इतिहास अनुभवण्याची एक प्रेरणादायी वारी ठरली. पन्हाळगडापासून पावनखिंडीपर्यंतचा खडतर प्रवास करताना सहभागी दुर्गवीरांनी शिवरायांचा पराक्रम, बाजी प्रभूंची निष्ठा आणि मावळ्यांचे अतुलनीय शौर्य अनुभवले. या ऐतिहासिक वाटेवर चालताना प्रत्येक पावलागणिक इतिहासाशी नाळ जोडली गेली. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ही पदभ्रमंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाला वाहिलेली मानवंदना आहे. पंढरीच्या वारीप्रमाणेच आयुष्यात एकदा तरी पन्हाळा ते पावनखिंड वारी प्रत्येकाने अनुभवावी.

- श्रेया मनोहर मालंडकर,

दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

@durgveer.pratishthan

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande