
अमरावती, ६ ऑगस्ट (हिं.स.) : चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत १७ विद्यार्थिनींमध्ये अचानक विचित्र लक्षणे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काही विद्यार्थिनी विनाकारण मोठ्याने हसणे, रडणे तसेच असंबद्ध बोलणे अशा प्रकारचे वर्तन करत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.या घटनेनंतर परिसरात ‘भूतबाधा’च्या अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या अफवांना दुजोरा दिलेला नसून विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी तातडीने डॉक्टरांचे पथक आश्रमशाळेत पाठवले. डॉक्टरांनी विद्यार्थिनींची तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी आमदार राजकुमार पटेल यांनी अमरावती येथील अप्पर आदिवासी विकास आयुक्तांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर अप्पर आयुक्तांनी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.
मुख्याध्यापक चौधरी यांनी सर्व विद्यार्थिनी सुरक्षित असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, एकताई गावातील एका विद्यार्थिनीमध्ये प्रथम ही लक्षणे दिसून आली. त्यानंतर पाचडोगरी, चौबीता आणि बुटीदा येथील काही विद्यार्थिनींमध्येही अशाच प्रकारची लक्षणे दिसल्याचे सांगण्यात येत आहे. एका विद्यार्थिनीला त्रास सुरू झाल्यानंतर इतर मुलींमध्येही समान स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिसल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली.
दरम्यान, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी स्पष्ट केले की, “वैज्ञानिक युगात भूत-प्रेत असा कोणताही प्रकार नसतो. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आश्रमशाळेसह संबंधित गावांमध्येही तपासणी करत आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”
प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत असून, पुढील वैद्यकीय तपासण्यांनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी