
परभणी, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकरी शेतकर्यांसाठी आर्थिक बळ देणार्या महत्त्वाच्या संस्था आहे. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची आवश्यकता असून, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रथमच भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, संचालक मंडळाने एकमताने रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या भेटीत बोर्डीकर यांनी राज्य नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, संचालक दत्तराव मायंदळे, सुनील भोंबे आणि रामभाऊ आरगडे उपस्थित होते.
यावेळी रामप्रसाद बोर्डीकर यांनी सहकार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक म्हणून मिळालेली जबाबदारी परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगत, बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनीही सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्य करण्याचे आवाहन केल्याचे म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis