
यवतमाळ, 06 ऑगस्ट, (हिं.स.) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डेमुक्त करण्याची मागणी’यवतमाळ का राजा नवयुवक गणेशोत्सव मंडळ’च्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी यांना अध्यक्ष मनोज परसारी यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.
यंदा गणेश चतुर्थीपासून शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य मिरवणुका निघणार असून, ‘यवतमाळ का राजा’च्या मिरवणुकीत हजारो भाविक, नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुले सहभागी होतात. तसेच विविध राज्यांतील कलाकार, ढोल-ताशा पथके, लेझीम पथके आणि सांस्कृतिक कलाकारही सहभागी होत असल्याने शहराची सांस्कृतिक व धार्मिक ओळख अधिक दृढ होत आहे.मात्र, शहरातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान अपघात होण्याची तसेच भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १४ सप्टेंबरपूर्वी शहरातील प्रमुख रस्ते तसेच ‘यवतमाळ का राजा’ गणेशोत्सवाच्या मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. यामुळे भाविक, नागरिक व बाहेरून येणा-या कलाकारांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येईल तसेच शहराची प्रतिमाही उंचावेल, असे मंडळाने निवेदनात नमूद केले आहे. रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्यास अपघात, जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती माजी मंत्री मदन येरावार, नगराध्यक्षा प्रियांदर्शिनी उईके, उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरुस्त होते का, याकडे लक्ष लागले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी