
बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक आणि कष्टकरी वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी परळी येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सीटूचे अध्यक्ष प्रा.खाडे बी.जी. यांनी दिली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांसमोरील प्रश्न अधिक गंभीर झाले असून, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतमालाला हमीभाव, बेरोजगारांना रोजगार, रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पीक विमा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई, शेतमजुरांना कामाची हमी, मजुरीत वाढ आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता उड्डाणपूलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीटचे अध्यक्ष प्रा.खाडे बी.जी., किरण सावजी, किसान सभेचे काॅ.अजय बुरांडे , मुरली नागरगोजे व शेतमजूर युनियनचे नेते सुदाम शिंदे आदींनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis