शेकदरी लघुप्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र
निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ, एक हेक्टर ६० आर जागेवर सुसज्ज पर्यटन केंद्र अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.) सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले शेकदरी लघुप्रकल्प पर्यटन केंद्र हिरवाई, जलाशय आणि विविध पर्यटन सुविधांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. म
शेकदरी लघुप्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र


निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ, एक हेक्टर ६० आर जागेवर सुसज्ज पर्यटन केंद्र

अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले शेकदरी लघुप्रकल्प पर्यटन केंद्र हिरवाई, जलाशय आणि विविध पर्यटन सुविधांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र येथे पुरेशा सुरक्षेचा अभाव असल्याने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शेकदरी सिंचन विभागाने सुमारे एक हेक्टर ६० आर जागेवर सुसज्ज पर्यटन केंद्र उभारले आहे. हिरवेगार लॉन, रंगीबेरंगी फुलांची बाग, लहान मुलांसाठी खेळण्यांची सुविधा, प्रशस्त सभागृह आणि फलंदाजीचा सराव करण्यासाठीची व्यवस्था असल्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देत आहेत. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या या परिसरात घनदाट वनसंपदा असून सुखी नदीचे उगमस्थानही जवळ आहे. प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याचा शुभ्र धबधबा आणि परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना विशेष आकर्षित करत आहे.

या जंगल परिसरात मोर, कोल्हे, रानडुक्कर, रोही, विविध पक्षी तसेच वाघ, अस्वल आणि बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. परिसरातील प्राचीन श्री कपीलेश्वर शिवलिंग गुहा आणि सात कुंडांमुळे भाविक व पर्यटकांचीही मोठी गर्दी होत असते. पर्यटन केंद्र सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुले असले तरी येथे सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याची तक्रार आहे. काही अल्पवयीन मुलांकडून तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांकडून परिसरात गैरप्रकार होत असल्याचे सांगितले जात असून पर्यटनस्थळाची सुरक्षितता वाढविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande