अमरावतीत बंद सार्वजनिक शौचालयाचे शिवसेनेकडून प्रतीकात्मक उद्घाटन
अमरावती, ६ ऑगस्ट (हिं.स.) : गाडगेनगर पोलीस ठाण्याजवळ अमरावती महानगरपालिकेने सुमारे ३३ लाख रुपये खर्चून उभारलेले सार्वजनिक शौचालय गेल्या चार वर्षांपासून पाणी आणि देखभालीअभावी सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आंद
बंद सार्वजनिक शौचालयाचे शिवसेनेकडून प्रतीकात्मक उद्घाटन; मनपा प्रशासनाविरोधात संताप


अमरावती, ६ ऑगस्ट (हिं.स.) : गाडगेनगर पोलीस ठाण्याजवळ अमरावती महानगरपालिकेने सुमारे ३३ लाख रुपये खर्चून उभारलेले सार्वजनिक शौचालय गेल्या चार वर्षांपासून पाणी आणि देखभालीअभावी सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बंद शौचालयाचे प्रतीकात्मक उद्घाटन करून मनपा प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला. यावेळी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांसाठी उभारलेली सुविधा वापराविना पडून असल्याचा आरोप करण्यात आला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या शौचालयाबाबत मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, परिसरात घाण साचून दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक निधीतून उभारलेली सुविधा चार वर्षांपासून बंद असल्याने निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हे शौचालय तातडीने पाणी, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधांसह सुरू करून नियमित देखभाल करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेकडून यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात प्रदीप बाजड, नितीन तारेकर, रवी काकडे, संजय राऊत, प्रमोद देशमुख, सतीश क्षीरसागर, प्रा. रामेश्वर वसु, विजय बेनोडकर, अजय बोबडे, दिलीप काकडे, अशोक उसळ, डॉ. गिरी, विनोद मंडाळकर, आकाश वाकोडे, अमोल कंकाळे, बंटी जामोदकर आणि रामदास माणीकपुरे आदी सहभागी झाले होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande