
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जळकोट तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील बहुतांश जलस्रोत तुडुंब भरले असून अनेक वर्षांनंतर पाण्याची चिंता दूर झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुमारे ४५० मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीवर दिसून येत आहे.
सततच्या पावसामुळे गावोगावी असलेले तलाव, बंधारे, ओढे आणि नाले पाण्याने भरले आहेत. अनेक विहिरींनीही काठ गाठला असून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यातही पाणीटंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतशिवार हिरवाईने नटले असून सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस यांसह विविध खरीप पिकांची वाढ जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असून यंदा उत्पादन चांगले मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तालुक्यात यंदा वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटला आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेलमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कृषी क्षेत्रासह पर्यावरणासही या पावसाचा मोठा लाभ झाला आहे. डोंगर रांगा, कुरणे आणि शिवार हिरवाईने फुलून गेले असून निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis