ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन
सातारा, 06 ऑगस्ट (हिं.स.) : ’डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या साहित्यकृतींना वाचकांच्या मनात घर करून राहिलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (वय ९१) यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निध
श्रीनिवास विनायक कुलकर्णी


सातारा, 06 ऑगस्ट (हिं.स.) : ’डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या साहित्यकृतींना वाचकांच्या मनात घर करून राहिलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (वय ९१) यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. फेब्रुवारीमध्ये खुब्याचे हाड मोडल्याच्या त्रासातून ते बरे झाले होते. पण, त्यानंतर त्यांची प्रकृती क्षीण होत गेली. दरम्यान कराड येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तब्बल अर्धशतकाहून अधिककाळ साहित्यसेवा करणारे व्रतस्थ लेखक काळाच्या पडद्याआड गेले आहेत.. श्रीनिवास कुलकर्णी यांचे लेखन महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता धारवाड आणि कोलकतापर्यंत पोहोचले असून त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील औदुंबर या गावी जन्म झालेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण औदुंबरमध्येच झाले, तर सातवीपर्यंतचे शिक्षण अंकलखोप येथे झाले. त्यापुढील शिक्षण सांगलीच्या ‘अनाथ विद्यार्थी आश्रम’ या संस्थेत राहून पूर्ण केले. त्यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते. या दोघांच्या सान्निध्यात होणारे कलेचे संस्कार आणि औदुंबरच्या परिसराच्या वातावरणाचा परिणाम यांमधून श्रीनिवास कुलकर्णी यांचे संस्कारशील, संवेदनक्षम मन तयार झाले. शिक्षण संपल्यावर प्रथम दोन वर्षे साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय व नंतर ओगलेवाडी येथील काच कारखान्यात हिशेब खात्यात नोकरी केली. त्यानंतर ‘मौज’ या नियतकालिकाच्या संपादन विभागात त्यांनी काम केले.

कवितेवर आत्यंतिक प्रेम असलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांची पहिली कविता मराठी चौथीत असताना पां. ना. मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’मध्ये प्रसिद्ध झाली होती. पहिली गोष्ट का. रा. पालवणकरांच्या ‘खेळगडी’च्या शेवटच्या बाललेखांकात प्रसिद्ध झाली. ‘बालकवींच्या प्रतिभेने कविता न लिहिता गद्य लिहिले असते तर ते लेखन श्रीनिवास कुलकर्णी यांचेच झाले असते’, अशा शब्दांत मंगेश पाडगावकर यांनी कुलकर्णी यांच्या लेखनाचे मोल उलगडले.

‘मनातल्या उन्हात’ हा त्यांचा ललित लेख १९६० मध्ये ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाला. त्यांचे सर्व लेख प्रथम ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. ‘पाण्याचे पंख’ या संग्रहात त्यांनी घरात आणि सभोवती असणाऱ्या, वावरणाऱ्या लहान मुलांचे भावविश्व साकारले आहे. अलोक, पदम, मनू, मिकी या लहान मुलांचे हसणे, खेळणे, बागडणे हे लेखकाच्या नजरेतून टिपताना आपल्या सभोवतालच्या लहान मुलांच्या जगाशी त्यांचे नाते जुळलेले दिसते. ‘कोरडी भिक्षा’ या संग्रहातील व्यक्तिचित्रांच्या चित्रणातून पुन्हा वेगळे अनुभव वाचकांसमोर उलगडतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande