
अमरावती, ६ ऑगस्ट (हिं.स.) : माजी खासदार नवनीत राणा यांच्या एका वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये राणा यांनी, “मेरे लहजे पे सवाल मत उठाओ... मैं भरी सभा में सांप को साप कहने की हिम्मत रखती हूं,” असे वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
या विधानातील “साप” हा उल्लेख नेमका कुणाकडे निर्देश करणारा आहे, याबाबत राजकीय स्तरावर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. नवनीत राणा यांनी आपल्या वक्तव्यात कोणत्याही व्यक्तीचे किंवा पक्षाचे नाव घेतलेले नसले, तरी त्यांच्या आक्रमक वक्तृत्वशैलीमुळे या विधानाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
सोशल मीडियावर या वक्तव्यावर समर्थक आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, विविध चर्चांना उधाण आले आहे. राणा दाम्पत्य त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक राजकीय भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहे.
निवडणुका असोत किंवा विविध सामाजिक-राजकीय मुद्दे, नवनीत राणा यांच्या भाषणशैलीमुळे अनेकदा राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे त्यांच्या या ताज्या वक्तव्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या विधानावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते आणि त्यातून पुढील राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे अमरावतीसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, कोणाचेही नाव न घेता केलेल्या या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी