
रत्नागिरी, 6 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट गुरांच्या समस्येवर राजापूर पालिकेने कडक पावले उचलली आहेत. मोकाट गुरांना पकडून त्यांची चिपळूणच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.
राजापूर शहरातील बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढल्याने व्यापारी, नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारच्या आठवडा बाजारादरम्यान या समस्येचा मोठा फटका बसत होता. मोकाट गुरांमुळे अनेक किरकोळ अपघात घडत होते.
यापूर्वी पालिकेने गुरे पकडून ती मालकांच्या ताब्यात दिली होती, मात्र काही दिवसांतच ती पुन्हा रस्त्यावर फिरताना आढळल्याने प्रशासनाने यावेळी कठोर भूमिका घेतली. नगराध्यक्षा ॲड.हुस्नबानू खलीफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाने ही विशेष धरपकड मोहीम राबवली.
पकडलेली गुरे जुन्या रेस्ट हाऊस परिसरातील कोंडवाड्यात ठेवून सुमारे वीस ते चोवीस दिवस त्यांना चारा, पाणी व आवश्यक देखभाल कवण्यात आली. घंटागाडीच्या माध्यमातून मालकांना वारंवार आवाहन करून दंड भरून गुरे नेण्यास सांगण्यात आले. काही मालकांनी दंड भरून गुरे परत नेली. मात्र उर्वरित १३ गुरांचे मालक पुढे न आल्यामुळे प्रशासनाने सर्व शासकीय व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून या गुरांची चिपळूण येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी केली आहे.
शहरातील मोकाट गुरांविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरेमालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, अन्यथा नियमानुसार कडक दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा पालिकेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी