आसाम पूरग्रस्तांसाठी पालघरमधील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी दिले १७,०६० रुपये
पालघर, 06 ऑगस्ट (हिं.स.) - समाजाप्रती संवेदनशीलता आणि मानवतेचा अनोखा संदेश देणारी घटना जव्हार प्रकल्पातील अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळा, दाभेरी येथे घडली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी मिळणारे पैसे जतन करून आसाममधील पूरग्रस्त बा
मदत


पालघर, 06 ऑगस्ट (हिं.स.) - समाजाप्रती संवेदनशीलता आणि मानवतेचा अनोखा संदेश देणारी घटना जव्हार प्रकल्पातील अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळा, दाभेरी येथे घडली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी मिळणारे पैसे जतन करून आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी १७,०६० रुपये इतकी रक्कम जमा केली. ही रक्कम त्यांनी जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्याकडे सुपूर्त केली.

डॉ. अपूर्वा बासुर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सहानुभूती आणि आपत्तीग्रस्तांविषयीची संवेदनशीलता अधिक दृढ झाली. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या छोट्याशा खाऊचा त्याग करून दिलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, कार्यालयीन अधीक्षक योगेश भोये, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ धोंडे, शाळेचे मुख्याध्यापक डी. जे. जामनिक तसेच विद्यार्थी कुंदन वळे आणि दर्शना गांगोडा उपस्थित होते.

यावेळी डॉ. अपूर्वा बासुर यांनी शाळेत सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून त्यांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा विकसित करणारे आणि व्यक्तिमत्त्व घडविणारे असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या या उदात्त सामाजिक भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, 'मदतीची भावना वयावर नव्हे तर संस्कारांवर अवलंबून असते,' हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande