
नांदेड, 06 ऑगस्ट (हिं.स.)।आशिया खंडातील सर्वात मोठ्या उपसा जलसिंचन प्रकल्पांपैकी एक असलेला विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. अतिरिक्त पाणी गोदावरी नदीमार्गे तेलंगणा राज्यात वाहून जाणारे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने वापरून सोनखेड, बाभूळगाव, हरबळ परिसरातील कोरडे तलाव तातडीने भरावेत, अशी मागणी मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी शासनाकडे केली.
यंदा वरच्या खोऱ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरत आहे. नांदेड शहर, एमआयडीसी व इतर आवश्यक गरजांसाठी राखीव पाणी सुरक्षित ठेवूनअतिरिक्त पाण्याचा उपयोग ग्रामीण भागातील तलाव भरण्यासाठी करावा. अनेक भागांत अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने भविष्यात पिण्याचे पाणी व पशुधनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात नियोजनपूर्वक पाणी सोडण्यात आले, त्याच धर्तीवर विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत तलाव व लघुधरणे भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माधवराव देसाई, लिंगोजीराव शिंदे, गोपाळराव मोरे, आनंदराव मोरे, रघुनाथराव मोरे, संतोषराव पाटील, शिवाजीराव शिंदे आदींनी जलसंपदा विभागाकडे पाण्याचे नियोजनाची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis