गळक्या छताखाली युनियन बँकेचा कारभार
महत्त्वाची कागदपत्रे धोक्यात, कार्यालयातील उघड्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किटची भीती अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)। चिखलदरा येथील नगरपरिषद इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या युनीयन बँक ऑफ इंडियाच्या शाखेची दुरवस्था समोर आली आहे. इमारतीत ठिकठिकाणी छत गळ
गळक्या छताखाली युनीयन बँकेचा कारभार


महत्त्वाची कागदपत्रे धोक्यात, कार्यालयातील उघड्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किटची भीती

अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

चिखलदरा येथील नगरपरिषद इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या युनीयन बँक ऑफ इंडियाच्या शाखेची दुरवस्था समोर आली आहे. इमारतीत ठिकठिकाणी छत गळत असल्याने बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे व फायिली खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगरपरिषद आणि बँक व्यवस्थापनाकडून आवश्यक दुरुस्ती होत नसल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे. मुख्य बाजार चौकातील या शाखेत दररोज शेकडो ग्राहकांची वर्दळ असते. मात्र, बँकेतील विद्युत वायरिंग जीर्ण होऊन अनेक ठिकाणी उघडी पडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन अपघात होण्याची भीती कर्मचारी व ग्राहकांनी व्यक्त केली आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत असून, पिण्याच्या पाण्याचीही योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. बँकेतील फायिलींमध्ये उंदरांचा वावर असून, भिंतींना तडे गेले आहेत. काहीवेळा बँकेच्या आत सापही आढळल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँक व्यवस्थापन आणि नगरपरिषद प्रशासनाने तातडीने इमारतीची दुरुस्ती करून सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande