
रायगड, 06 ऑगस्ट, (हिं.स.) : खोपोली नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारच्या सत्रातील शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेने जाहीर आवाहनाद्वारे दिली आहे.
नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, पाणीपुरवठा योजनेची देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे दुपारच्या वेळेतील नियमित पाणीपुरवठा होणार नसला, तरी सकाळी सात वाजता नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
खोपोली शहरातील नागरिकांनी या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे आणि पाणी जपून वापरून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगर अभियंता अविनाश भोईर यांनी केले आहे.
नगरपरिषदेच्या या नियोजित देखभाल कामामुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)