तळेगावच्या पारधी वस्तीच्या घरोघरी पोहोचली वीज
बीड, ६ ऑगस्ट (हिं.स.) : तळेगाव येथील आदिवासी पारधी वस्तीवर अखेर विजेचा प्रकाश पोहोचला असून, पिढ्यान् पिढ्या अंधारात जीवन जगणाऱ्या कुटुंबांच्या घरात प्रथमच स्वतःची वीज जोडणी मिळाली आहे. महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी विभागाच्या सहकार्या
आदिवासी पारधी वस्तीवर प्रशासनाच्या सहकार्याने पडला प्रकाश


बीड, ६ ऑगस्ट (हिं.स.) : तळेगाव येथील आदिवासी पारधी वस्तीवर अखेर विजेचा प्रकाश पोहोचला असून, पिढ्यान् पिढ्या अंधारात जीवन जगणाऱ्या कुटुंबांच्या घरात प्रथमच स्वतःची वीज जोडणी मिळाली आहे. महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

तळेगाव येथील पारधी समाजातील अनेक कुटुंबे यापूर्वी बीड शहरातील रस्त्यांवर राहून उपजीविका भागवत होती. प्रशासनाच्या सहकार्याने त्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली तसेच पाण्याची सुविधाही करण्यात आली. मात्र, वीज जोडणीसाठी तीन किलोमीटर अंतरावरून खांब आणि डीपी उभारण्याचे काम खर्चिक व आव्हानात्मक होते.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पुकार’चे संवेदना फेलो आणि सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांनी तातडीने पुढाकार घेत एका दिवसात पारधी वस्तीवर मीटर बसविण्याचे आदेश दिले.

यापूर्वी वीज सुविधा नसल्याने या कुटुंबांना अंधारात राहावे लागत होते. पडीक जागेत वास्तव्य असल्याने साप, हिंस्र प्राणी आणि इतर अडचणींचा सामना करावा लागत होता. काही काळापूर्वी एका लहान बालकावर प्राण्याने हल्ला केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे येथील नागरिक सतत भीतीच्या वातावरणात राहत होते.

मीटर बसविण्याच्या वेळी अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत, महावितरणचे लेखाधिकारी प्रदीप वाघमोडे, तळेगावचे लाईनमन शेख रफिकभाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष निकाळजे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तत्त्वशील कांबळे उपस्थित होते.

महावितरणचे अधीक्षक अभियंता राजपूत यांनी स्वतः बल्ब, बोर्ड आदी साहित्याचा खर्च करून वस्तीतील घरांमध्ये दिवे लावून दिले. घरात पहिल्यांदाच विद्युत प्रकाश पडताच आदिवासी पारधी समाजबांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

आजपर्यंत दुसऱ्यांच्या प्रकाशावर अवलंबून राहणाऱ्या या कुटुंबांना आता स्वतःच्या घरातील उजेडाचा अनुभव मिळाला असून, हा क्षण त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande