
डोंबिवली, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पुर्वेकडील केळकर रोड परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषा राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरटीओ आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरात मानपाडा रोड, स्टार कॉलनी, सागाव आणि परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून रिक्षा उपलब्ध होत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षाचालकांकडून सर्रास भाडे नाकारले जात असल्याचा तसेच रिकाम्या रिक्षा प्रवाशांना न घेता पुढे जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे विशेषतः कामावरून परतणाऱ्या महिला व नागरिकांना स्टेशनवर दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
बुधवारी रात्री परिस्थिती अधिक गंभीर झाल्यानंतर नागरिकांनी मनीषा राणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचल्या आणि रिक्षाचालकांच्या विरोधात कठोर भूमिका घेत एकही रिक्षा पुढे जाऊ दिली नाही. यावेळी संतप्त नागरिकांनीही रस्त्यावर बसून आंदोलन करत निषेध नोंदविला.
या नघटनेची माहिती मिळताच आरटीओ अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याऐवजी त्यांनी रिक्षाचालकांची बाजू घेत काही रिक्षा मागील बाजूने सोडून दिल्याचा आरोप राणे यांनी केला. यामुळे रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.
रिक्षा युनियन नागरिकांच्या बाजूने उभे राहत नसून केवळ आर्थिक हितसंबंध जपत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच केळकर रोड परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणताही आरटीओ किंवा ट्रॅफिक अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राणे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, केळकर रोड येथे रिक्षा शिस्तबद्ध पद्धतीने उभ्या राहिल्या नाहीत आणि नागरिकांना पुन्हा त्रास झाला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.यासोबतच त्यांनी रिक्षा भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी मनीषा राणे यांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi