
यवतमाळ 06 ऑगस्ट (हिं.स.) मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात शिक्षक गुंतलेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्या होत्या. आता ‘एसआयआर’चे काम जवळपास आटोपले आहे. त्यामुळे आज पासून ता. जिल्ह्यातील संपूर्ण शाळांच्या वेळा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम २० जून २०२६ पासून सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्याच्या कामाकरिता बहुतांश केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, ३० जून ते आठ जुलै २०२६ या कालावधीत गणना पत्र बीएलओंच्या माध्यमातून मतदारांना घरोघरी जाऊन वितरित करणे, ते गोळा करणे, त्याची माहिती अॅपवर भरणे यासारखे कामकाज कालमर्यादेत पार पाडण्याची जबाबदारी शिक्षकांवर होती. व्यापक स्वरूप आणि मर्यादित कालावधीचा विचार करून जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या होत्या. आता विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम जवळपास ९० टक्क्याहून अधिक आटोपले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता शाळेच्या वेळात पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता गुरुवारपासून (ता. ६) संपूर्ण शाळा पूर्वव्रत करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्!यांच्या स्वाक्षरीचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे.
शैक्षणिक भरपाई आवश्यक
मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कामात बीएलओ म्हणून शिक्षक गुंतलेले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शाळा सकाळच्या सत्रात केल्या होत्या. तासिका कमी झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम पडला होता. आता मात्र शाळा पुर्वव्रत झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरपाई करून देण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे.
----------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी