
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. निर्धारित मुदतीनंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक व्यवस्था, पावसाळी उपाययोजना तसेच नदी-नाल्यांवरील अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलिस आणि अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी चाकण परिसरातील नदी, नाले आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे एका महिन्याच्या आत संबंधितांनी स्वखर्चाने हटवावीत, असे निर्देश दिले. मुदतीनंतरही अतिक्रमणे कायम राहिल्यास प्रशासनाकडून ती हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच प्रचलित कायदे व नियमांनुसार कारवाईही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत चाकण परिसरातील अपघातप्रवण आणि धोकादायक ठिकाणांचाही आढावा घेण्यात आला. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक गतिरोधक हटवून भारतीय रस्ता काँग्रेसच्या (IRC) मानकांनुसार नवीन गतिरोधक उभारावेत, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता चिन्हे, परावर्तक पट्ट्या आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. तसेच रस्त्यावर बेकायदा पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु