
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.) । दौंड नगरपालिकेच्या नागरिक हित संरक्षण मंडळाचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षित जागेसाठी सादर केलेले त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश काढून त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४-अ मधून रोहित राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत दौंड उपविभागीय अधिकाऱ्यांनी (प्रांताधिकारी) दिलेले कुणबी जात प्रमाणपत्र सादर केले होते. ओबीसी आरक्षित जागेवरून त्यांनी ७३३ मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. मात्र, त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या काही पराभूत उमेदवारांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी आणि सुनावणी केली. चौकशीदरम्यान कुणबी समाजातील असल्याचे तसेच आवश्यक रक्तसंबंध सिद्ध करणारे कोणतेही वैध दस्तऐवज किंवा पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द केले. या निर्णयाच्या आधारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रोहित पाटील यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे दौंड नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रभागातील पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड