
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
कोथरूड आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पावसाळी गटारे व नालेसफाईच्या कामांसाठी तब्बल ५१ टक्क्यांहून अधिक कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्याने महापालिकेच्या स्थायी समितीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. या निविदांना मंजुरी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय उद्या (६ ऑगस्ट) होणाऱ्या समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पावसाळी गटारांच्या साफसफाईसाठी सुमारे ८४ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. या कामासाठी सर्वात कमी दराची निविदा ५१.३९ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयासाठीही जवळपास याच प्रमाणात कमी दराची निविदा आली आहे.
याशिवाय शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील पावसाळी गटार सफाईच्या ८४ लाख रुपयांच्या कामासाठी ४५.११ टक्के कमी दराची निविदा सादर करण्यात आली आहे. इतर काही क्षेत्रीय कार्यालयांमधील निविदाही ३५ ते ४० टक्के कमी दराने आल्याची माहिती आहे.
गेल्या काही वर्षांपासून नालेसफाईच्या कामांसाठी ४० ते ५० टक्के कमी दराच्या निविदा सादर होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अशा कमी दरामुळे प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कमी दराच्या निविदांसंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते. हे धोरण अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कमी दराच्या निविदा समोर आल्याने या प्रस्तावांवर स्थायी समिती काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु