
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
देशातील सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी), पुणे येथे यंदापासून तीन नवे ‘बीटेक’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये ‘आयआयटी’मधील प्राध्यापकांसह उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आयआयआयटी, पुणेचे संचालक प्रा. विनीत कन्सल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी डॉ. जतीन मजीठिया, डॉ. नागेंद्र कुशवाह आणि डॉ. भूपेंद्र सिंह उपस्थित होते.
प्रा. कन्सल म्हणाले, की उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर येथील प्राध्यापक नियमित मायक्रो-क्रेडिट अभ्यासक्रम शिकवणार आहेत. तसेच आयबीएम इंडियाचे तज्ज्ञ आणि अमेरिकेतील विषयतज्ज्ञही अध्यापनात सहभागी होणार असून, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ व्यावसायिकांनाही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी संस्थेत आमंत्रित केले जाणार आहे.
संस्थेत सध्या इस्रो, एएनआरएफ आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने सुमारे आठ कोटी रुपयांचे सहा संशोधन प्रकल्प सुरू आहेत. तसेच आयआयटी मुंबईबरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून, त्याद्वारे संशोधन, नवोपक्रम, उद्योग सहकार्य तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाणीला चालना मिळणार आहे.
आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी एम्स नागपूर, पीजीआयएमएस लखनऊ आणि आयसीएमआर यांच्याशीही चर्चा सुरू असल्याची माहिती प्रा. कन्सल यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु