'कोणाचाही पुतळा हटवू नका, शिवरायांचा पुतळा उभारा' - जिप उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा, अशी इच्छा व्यक्त करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी कोणाचाही विद्यमान पुतळा हटविण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले.
'कोणाचाही पुतळा हटवू नका, शिवरायांचा पुतळा उभारा' - जिप उपाध्यक्ष इंद्रजीत पवार


सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा, अशी इच्छा व्यक्त करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी कोणाचाही विद्यमान पुतळा हटविण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि संभाजी ब्रिगेडने त्यास विरोध दर्शविला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आवारातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा पुतळा हटविण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत पवार म्हणाले, कोणाचाही पुतळा हटविण्याचा प्रश्नच नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा, ही माझी वैयक्तिक आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून मनापासून इच्छा आहे.

शिवरत्न सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या ठरावाबाबत बोलताना त्यांनी, जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून स्थायी समितीत हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. अशा महान नेत्याचे नाव सभागृहाला देण्यात चुकीचे काय आहे? असा सवालही उपस्थित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande