
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नागरिकांच्या दैनंदिन सेवांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब त्रिभुवन होते.
सभेत पशुवैद्यकीय सेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी पशुरुग्णालयातील पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरावेट कर्मचारी आणि इतर आवश्यक मनुष्यबळ पुरविणाऱ्या सेवेला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पशुरुग्णालय, प्राणिसंग्रहालय तसेच भटक्या प्राण्यांशी संबंधित अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक फर्निचर व साहित्य खरेदीला मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील रस्ते, बीआरटी रेलिंग, फुटपाथ दुरुस्ती आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांनाही हिरवा कंदील देण्यात आला.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वार्षिक परीक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रातील आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांच्या संचालन व देखभालीसाठी आवश्यक कार्यवाहीलाही मंजुरी देण्यात आली.
सभेत वायसीएम रुग्णालयाच्या नव्या इमारतीला नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्यांच्या यांत्रिक साफसफाई व देखभालीच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आपदा मित्र आणि ट्रेनी फायरमन यांच्या मानधनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील स्वच्छता, देखभाल आणि उद्यान व्यवस्थापनाच्या कामास मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे क्रीडा सुविधांची नियमित देखभाल होऊन खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु