पुणेकरांच्या कचऱ्यापासून खत, नफा मात्र ठेकेदारांचा?
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे महापालिका शहरातील नागरिकांकडून कराच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा महसूल गोळा करत असतानाच दररोज सुमारे २,४०० टन कचरा संकलित करते. या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी संबंधित खासगी ठेकेदारांना प्रक्रिया शुल्क (टिपिंग फी) अदा
PMC news


पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

पुणे महापालिका शहरातील नागरिकांकडून कराच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा महसूल गोळा करत असतानाच दररोज सुमारे २,४०० टन कचरा संकलित करते. या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी संबंधित खासगी ठेकेदारांना प्रक्रिया शुल्क (टिपिंग फी) अदा केले जाते. मात्र, याच ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत बाजारात आणि ऑनलाइन माध्यमातून प्रतिकिलो १८० रुपयांना विकले जात असल्याने ठेकेदारांच्या नफ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे २,४०० टन कचऱ्यापैकी १,२०० ते १,३०० टन ओला कचरा असतो. हा कचरा महापालिका स्वखर्चाने प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोहोचवते. याशिवाय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदारांना टिपिंग फीच्या स्वरूपात मोठा निधीही दिला जातो.

या ओल्या कचऱ्यापासून ‘भूमीग्रीन’सह खासगी संस्थांकडून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. मात्र, हे खत महापालिकेला किंवा नागरिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याऐवजी ते बाजारात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रतिकिलो १८० रुपयांच्या दराने विकले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चातून तयार होणाऱ्या उत्पादनाचा आर्थिक लाभ खासगी ठेकेदारांकडे जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande