
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ३९ बालकांवर ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील बालाजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गंभीर हृदयविकाराने त्रस्त असलेल्या बालकांना वेळेत उपचार मिळून नवजीवनाची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, एकही बालक तपासणी व आवश्यक उपचारांपासून वंचित राहू नये, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून बालकांची तपासणी करून गंभीर आजार निदर्शनास आल्यास तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ५२ आरोग्य पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे आणि शाळांमधील सात ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड