सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा; आठ दिवसांपासून नागरिक त्रस्त
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सततचा पाऊस, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि वाहतूक पोलिस
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा; आठ दिवसांपासून नागरिक त्रस्त


पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सततचा पाऊस, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि वाहतूक पोलिसांची अपुरी उपस्थिती यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अलीकडेच सुरू झालेल्या उड्डाणपुलामुळे आनंदनगर येथील भा. द. खेर चौक आणि माणिकबाग येथील आप्पासाहेब मोरे चौकातील वाहतूक कोंडीत काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी पुलाच्या दोन्ही टोकांवर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विश्रांतीनगर येथील प्रकाश इनामदार चौकात आनंदविहार, तुकाईनगर, महादेवनगर, समर्थनगर आणि सिंहगड महाविद्यालय परिसरातून येणारी वाहने तसेच धायरी, नऱ्हे आणि खडकवासला भागांतून येणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्र येत असल्याने येथे मोठी कोंडी होत आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी उड्डाणपूल, कालवा रस्ता आणि पुलाखालून येणाऱ्या वाहनांमुळे फनटाइम चित्रपटगृह चौक आणि वडगाव उड्डाणपुलाखाली वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा धायरीपर्यंत पोहोचत आहेत.

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नागरिकांनी विठ्ठलवाडी येथील पदपथाची रुंदी कमी करून अतिरिक्त रस्त्याची जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाराम पूल येथील बसथांबा बंद करून पीएमपीएमएल बसेस थेट उड्डाणपुलावरून वळविल्यास पुलाखालचा वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

याशिवाय प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करून नियमांचे काटेकोर पालन, अतिक्रमणांवर कारवाई आणि वाहतूक नियोजन प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande