
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दिवसभर घटत राहिली. परिणामी, पूरनियंत्रणासाठी भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात जलसंपदा विभागाने टप्प्याटप्प्याने कपात केली.
सकाळी ६ वाजता धरणाच्या सांडव्यावरून १ लाख ११ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतर सकाळी ७ वाजता तो एक लाख क्युसेक, सकाळी ११.३० वाजता ९० हजार क्युसेक आणि दुपारी ३ वाजता ६० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. रात्री ८.३० वाजता वीजगृहाच्या १,६०० क्युसेकसह भीमा नदीपात्रातील एकूण विसर्ग ४१ हजार ६०० क्युसेक इतका नोंदविण्यात आला.
दौंड येथून उजनी धरणात येणारी पाण्याची आवकही दिवसभर कमी होत गेली. सकाळी ६ वाजता ५७ हजार ७६१ क्युसेक असलेली आवक दुपारी ३ वाजता ३९ हजार १२८ क्युसेक, तर सायंकाळी ६ वाजता ३४ हजार ६६६ क्युसेकपर्यंत घसरली.
सकाळच्या नोंदीनुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५३.४६ टीएमसी म्हणजेच ९९.७८ टक्के होता. दिवसभर विसर्ग आवकेपेक्षा अधिक राहिल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो ५२.९२ टीएमसी (९८.७९ टक्के) इतका झाला. धरणाची जलपातळी ४९६.७७५ मीटर नोंदविण्यात आली.
जलसंपदा विभागाने भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुढील काळात धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड