
आमदार सुभाष देशमुखांनी घेतली 'वर्षा' निवासस्थानी भेट
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.) : दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबईतील 'वर्षा' शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामे, जनहिताचे प्रश्न आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत भीमा-सीना जोड कालवा प्रकल्प, कुडल संगम तीर्थक्षेत्राचा विकास, सीना-भीमा नदीवरील बॅरेजेस, मंद्रूप येथील नवीन बसस्थानक, होटगी येथील आयटी पार्क, जुळे सोलापूर येथे आधुनिक नाट्यगृह उभारणी, दुबई युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनासाठी शासकीय सहकार्य तसेच कौशल्य विकास विद्यापीठाच्या उभारणीसह विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
आमदार सुभाष देशमुख यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा आणि शासनाचे सहकार्य मिळावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडण्यात आलेल्या विषयांची सकारात्मक दखल घेत संबंधित प्रकल्पांबाबत आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांवरही सविस्तर चर्चा झाली.
या विकासकामांमुळे दक्षिण सोलापूरसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळेल, असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड